शासनाकडून सार्वजनिक वितरण व्यतवस्थेअंतर्गत अन्नधान्य सुरक्षिततेच्या दृष्टीने खालील योजना राबविण्यात येतात

बी.पी.एल. योजना

दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना प्रति कार्ड 20 किलो गहू 5 रुपये किलो व 15 किलो तांदुळ 6 रुपये किलो दराने दर महिन्याला देण्यात येतो. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पिवळी शिधापत्रीका देण्यात येते.

अंत्योदय योजना

दारिद्र्य रेषेखालील गरीबातील गरीब लाभार्थ्यांसाठी या अंत्योदय योजनेत प्रतिकार्ड 22 किलो गहू केवळ 2 रुपये किलो आणि 13 किलो तांदुळ 3 रुपये किलो या दराने वितरीत होतो. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पिवळी शिधापत्रीका देण्यात येते.

ए.पी.एल. योजना

ही योजना 1 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेल्या केशरी कार्डधारकांसाठी आहे. त्यांना प्रतिकार्ड 5 किलो तांदुळ 9.60 रुपये प्रतिकिलो या दराने आणि 10 किलो गहू प्रति किलो 7.20 रुपये दराने देण्यात येतो. या सर्व प्रकारातील धान्याचे वितरण लाभार्थीनिहाय व एका महिन्याच्या कालावधीसाठी देण्यात येते. शासनाने नेमलेल्या स्वस्त धान्य दुकानामार्फत या धान्याचे वितरण करण्यात येते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना केशरी शिधापत्रीका देण्यात येते.

शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना (Mid-Day Meal-MDM)

या योजनेत 1 ली ते 5 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरमहा 24 दिवसांसाठी 100 ग्राम आणि 6 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 24 दिवसांसाठी 150 ग्राम तांदुळ शाळेमध्ये शिजवून दिला जातो.

किशोरवयीन मुलींसाठी पोषण आहार (Nutritional Program for Adolescent Girls- NPAG)

ही योजना 13 ते 19 वर्ष वयोगटातील ज्या किशोरवयीन मुलीचे वजन 35 किलोपेक्षा कमी आहे अशा कुपोषित मुलींकरिता केंद्र पुरस्कृत या योजनेची राज्यातील नांदेड आणि नागपूर या दोन जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येते. अशा मुलींचे महिला व बालकल्याण विभागामार्फत वजन करुन लाभार्थी निश्चित करण्यात येते. संबंधित गांवातील ग्रामपंचायतीची महिला सदस्याच त्यास साक्षांकित करतात. लार्भाथी मुलींना दरमहा 6 किलो तांदुळ मोफत दिला जाते. अशा किशोरवयीन मुलींची यादी ग्रामसभेच्या मान्ययतेनंतर अंतिम केली जाते. या लाभार्थी किशोरवयीन मुलींना स्वस्त धान्य दुकानामार्फत नियमानुसार तांदुळाचे वाटप केले जाते.

लहान मुलांच्या पोषण आहारासाठी अंगणवाडी योजना (Wheat Based Nutritional Program-WBNP)

जनतेचे पालकत्व स्वीकारलेल्या सरकारने देशातील दरडोई उत्पन्न आणि गरिब लोकसंख्येचा विचार करुन या देशाचे भवितव्य असलेल्यां लहान मुलांसाठी पोषण आहार कार्यक्रम हाती घेतलेला आहे. या अंतर्गत जिल्हा परिषदेकडून एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून प्राप्त उपस्थितीपटाच्या आधारावर अंगणवाडीतील बालकांसाठी गहू आणि तांदुळ याचे वाटप महिला बचत गटामार्फत करण्यात येते.

नवसंजीवनी योजना

या योजनेअंतर्गत पावसाळ्यात ज्या गांवाचा संपर्क तुटण्याची शक्यता असते अशा गांवासाठी जुन, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याचे धान्य त्या गांवच्या रास्त‍भाव दुकानदारास जुन महिन्यात एकदाच आगाऊ स्वरुपात दिले जाते. जिल्ह्यातील किनवट आणि माहूर तालुक्यासाठी ही योजना कार्यान्वीत करण्यात आलेली आहे.

अन्नपुर्णा योजना

65 वर्षापेक्षा जास्त वय असणा-या तसेच ज्यांना शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाहीत अशा व्यक्तींना प्रति व्यक्ती 10 किलो धान्याचा मोफत पुरवठा रास्तभाव दुकानदारामार्फत करण्यात येतो. गरीब व वयोवृध्द गरजू लोकांसाठी उपयुक्त असलेल्या या योजनेच्या माध्यतमातून शासन अशा लोकांचा म्हातारपणातील आधार बनत आहे.

पामतेल वितरण

दैनंदिन गरजेतील खाद्य तेलाची गरज लक्षात घेवून तसेच खुल्या बाजारातील तेलाच्या किमंतीवर नियंत्रण ठेवण्याठच्या दृष्टीने प्रतिलिटर 30 रु. या दराने रास्त भाव दुकानामार्फत पामतेल उपलब्ध करुन देण्यात येते. या योजने अंतर्गत बी.पी.एल, अंत्योदय, ए.पी.एल. (केशरी), शिधापत्रीका धारकांना याचा लाभ देण्यात येतो.

तुरडाळ वितरण

तूरडाळीच्या भावात झालेली प्रचंड वाढ लक्षात घेवून शासनाने गोरगरिब व सर्व सामान्यांना तूरडाळ उपलब्ध व्हावी या हेतूने प्रतिकार्ड 1 किलो तूरडाळ 55 रुपये या दराने उपलब्‍ध करुन दिले आहे. या योजने अंतर्गत बी.पी.एल., अंत्योदय, ए.पी.एल. (केशरी), शिधापत्रीका धारकांना याचा लाभ देण्यात येतो.

साखर वितरण

दारिद्रय रेषेखालील कुटूंबाला प्रतिव्यक्ती 500 ग्राम याप्रमाणे 13.50 रुपये / किलो या दराने बी.पी.एल. साखरेचे वितरण करण्यात येत आहे. तर खुल्या बाजारातील साखरेच्या भावावर नियंत्रण रहावे यासाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी ए.पी.एल. या योजनेतील साखर दरमहा प्रतिकार्ड (केशरी कार्ड) 2 किलो साखर 20 रुपये प्रतिकिलो या दराने देण्यात येते.

केरोसीन वितरण

अन्नधान्याच्या गरजेबरोबरच इंधन ही एक जीवनावश्यक गरज आहे. त्या मुळे ज्या कार्डधारकांकडे एक सिलेंडर आहे त्याला दरमहा 2 लिटर केरोसीन 14 रुपये प्रतिलिटर या दराने देण्यात येते.

गॅस सिलेंन्ड‍र वितरण

घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण विविध नियुक्त गॅस एजंन्सीच्या मार्फत करण्यात येते. आय.ओ.सी., बी.पी.सी., एच.पी.सी. या शासनाच्या अंगीकृत गॅस कंपन्या आपल्या एजंन्सी मार्फत प्रतिक्षा यादी तयार करुन मागणीनुसार पुरवठा करतात. सिलेंडर हस्तगत केल्याचा 21 दिवसानंतर दुस-या सिलेंडरसाठी पुन्हा मागणी नोंदविता येते.